नवजात बाळाच्या पोषणासाठी आणि मातांच्या आरोग्यासाठी स्तनपान आवश्यक : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – स्तनपान हे नवजात बाळाच्या पोषणासाठी, प्रतिकारशक्तीसाठी आणि मातांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या काळात बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, यातून बालकांचे कुपोषित होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आईने बाटलीऐवजी बाळाला स्वत:चे दूध पाजावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका, अहमदनगर बालरोग तज्ज्ञ संघटना व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल येथे करण्यात आला. यावेळी बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील कटारिया, बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. उज्ज्वला शिरसाठ, स्त्रीरोग संघटनेच्या सचिव डॉ. नीलम बागल, रोटरी क्लबच्या संचालिका डॉ. श्रेया खासगीवाले, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, वैद्यकीय अधिकारी तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप बागल आदी उपस्थित होते.

नवजात बालकाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान दिले पाहिजे. यातून बाळाला सर्व जीवनसत्त्वे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक मिळत असतात. ज्यामुळे बाळाला पोटाचे विकार, एलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार होण्याचे धोके कमी होतात. बाळाच्या जन्मानंतर २० मिनिटांच्या आत बाळाला आईच्या छातीवर झोपवून दूध देणे म्हणजे एकप्रकारचे लसीकरणच आहे. येथूनच बाळाची रोगप्रतिकारण शक्ती निर्माण होण्यास सुरुवात होते. स्तनपानामुळे मातांच्या स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते. बाटलीने दूध भरणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास मदत होते. स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोतम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्त्व, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गापासून, एलर्जी यांसारख्या रोगांचा प्रतिकार करणे शक्य होते, अशा शब्दात उपस्थित बालरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्तनापानाचे महत्त्व पटवून दिले. शेवटी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे सचिव अमर गुरप यांनी आभार मानले.