भावंडांच्या प्रेमाचा, विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक वेगळ्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या बहेनजींनी राखी बांधताना कारागृहातील बंदीवानांच्या डोळ्यात भावनांचे तरंग दाटून आले.
या कार्यक्रमात ब्रह्मकुमारींच्या निर्मला दीदी, ॲड. निर्मला चौधरी, ज्ञानेश्‍वरी दीदी, मनीषा दीदी यांनी बंदीवानांसह कर्तव्यावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना राख्या बांधल्या. बंदीवानांसाठी हा क्षण घरातील सणांच्या आठवणींनी भरलेला होता. या कार्यक्रमाला तुरुंगाधिकारी (श्रेणी-१) विजय सोळंके, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) अरुण मदने, हवालदार गणेश बेरड, सूर्यकांत ठोंबरे, नंदकुमार शिंदे, सुप्रभात दीदी, ॲड. पूजा ढोले पाटील, ॲड. शैलेश माघाडे आदी उपस्थित होते.