वाशिम:

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगामातील ‘ई-पीक पाहणी’च्या प्रक्रियेत शेतकऱ्यांसमोर अनेक तांत्रिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. शासनाने सुरू केलेल्या डीसीएस मोबाईल ॲपचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतातील ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करत आहेत. मात्र, सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने त्यांना तासभर शेतात थांबूनही माहिती भरता येत नाही. ‘सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा’ असा संदेश सतत स्क्रीनवर दिसत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि मोबाईल डेटा वाया जात आहे. यामुळे शासनाची ई-पीक पाहणी योजना शेतकऱ्यांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे.

या ॲपमध्ये सतत लॉगिनची समस्या, सर्व्हर डाऊन होणे आणि योग्य लोकेशन न दिसणे अशा अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक पाहणीची नोंदणी करणे शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने किंवा ॲप वापरण्याचे तांत्रिक ज्ञान नसल्यानेही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे कठीण जात आहे. सर्वात मोठी अडचण म्हणजे, या परिस्थितीत स्थानिक कृषी सहाय्यकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. यामध्ये विमा योजना, अनुदान आणि मदत योजनांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने निर्धारित वेळेत पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, ती १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. शेतकऱ्यांनी या कालावधीत डीसीएस मोबाईल ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.

प्रतिनिधी फुलचंद भगत

एनटीव्ही न्यूज मराठी, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed