वाशिम:
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सवाची ओढ लागली आहे. गणरायाचे मनमोहक रूप मूर्तीच्या माध्यमातून भक्तांसमोर मांडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार सोहम विनोद टेटवार आणि त्यांचे कुटुंब गेली २० वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती घडवत आहेत. त्यांनी यंदा वर्षभर मेहनत घेऊन अनेक सुंदर मूर्ती तयार केल्या आहेत. ४ इंच ते ८ फूट उंचीच्या विविध आकारांतील या मूर्ती पाहून मूर्तिकारीची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा जतन केल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
मूर्तिकार सोहम टेटवार यांनी सांगितले की, “आम्ही वर्षभर तयार केलेल्या या मूर्ती घरोघरी पोहोचल्यावर भक्तांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान दिसते, तेच आमच्या कामाचे खरे बक्षीस आहे.”
या वर्षी नैसर्गिक रंगांनी सजवलेल्या मूर्तींना विशेष मागणी आहे. हळद, काजळी आणि इतर नैसर्गिक रंगांचा वापर करून या मूर्तींना सुंदर रूप देण्यात आले आहे. स्थानिक कारागिरांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतूनच मूर्ती व साहित्य खरेदी केले जात आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने मंगरुळपीरसह इतर बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सेवाभावी आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन प्रियाताई गुल्हाने यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, “गणेशोत्सव काळात सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हा उत्सव साजरा करा. महिलांनीही या उत्सवाच्या काळात समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून आनंदात हा सण साजरा करावा.”
प्रतिनिधी फुलचंद भगत
एनटीव्ही न्यूज मराठी, वाशिम