- अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात.

जालना: जाफराबाद तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे जाफराबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जाफराबादचे तहसीलदार यांना निवेदन सादर करत, तालुक्यातील परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजी ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि मिरची ही पिके जवळपास नष्ट झाली आहेत. सततच्या पावसामुळे शेतीची पोत खराब झाली असून, पिकांना फळधारणा न झाल्याने उत्पन्नात मोठी घट येणार आहे. तसेच, नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेने या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, आर्थिक अडचणींमुळे आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५,००० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तहसीलदार यांनी तातडीने जिल्हाधिकारी, जालना यांच्यामार्फत शासनाला या परिस्थितीची माहिती द्यावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे, माजी समाजकल्याण सभापती रमेश धावलिया, माजी पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू म्हस्के, हरिश्चंद्र म्हस्के, समाधान सवडे, जनार्दन झोरे, बाबासाहेब बोरसे, मुकेश माकोडे, दगडूबा तंबेकर, शिवाजीराव रगड, संतोष रगड, योगेश कापसे, ज्ञानेश्वर कापसे, दगडूबा मोकळे, शहरप्रमुख देविसिंह बायस, मोहम्मद फैसल, इरफान शेख, समीर शहा, केशव दळवी आणि गजानन खंबाट यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.