
धाराशिव: गेल्या हंगामातील ऊसाची बिले थकवल्यामुळे साखर कारखानदार आणि निष्क्रिय सरकारविरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. आपल्या कष्टाचे पैसे अडवून ठेवल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज नळदुर्ग येथे गोकुळ शुगर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना लक्ष्य करत तीव्र आंदोलन केले.
ट्रक्सच्या काचा फोडत तीव्र निषेध
काल नळदुर्ग परिसरात शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत आपला आक्रोश व्यक्त केला. गोकुळ शुगर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अडवून संतप्त शेतकऱ्यांनी त्याच्या काचा फोडल्या आणि शासनाच्या निष्क्रियतेवर व कारखानदारांच्या मनमानीवर जोरदार हल्ला चढवला.
हजारो शेतकऱ्यांची बिले थकली
गेला हंगाम संपूनही जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची बिले अद्याप थकलेली आहेत. कारखानदार आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघटनांनी वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
‘बिले मिळेपर्यंत एकही कारखाना सुरू होणार नाही!’
यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. “जोपर्यंत आमच्या घामाचे थकीत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत एकही ऊस वाहतूक ट्रक रस्त्यावर येणार नाही आणि एकही कारखाना चालू देणार नाही. शेतकऱ्यांचा संयम संपला आहे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
📢 शेतकऱ्यांचे गंभीर आरोप: “सरकार कारखानदारांच्या बाजूने उभे आहे, शेतकऱ्यांच्या नव्हे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचा पैसा अडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले पाहिजे,” अशी मागणी संतप्त आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
प्रशासनाची धावपळ
नळदुर्गमध्ये निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनही घटनास्थळी धावले. मात्र, शेतकऱ्यांचा आक्रोश ओसरण्याचे नाव घेत नाहीये.
सरकारने या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा पुढील काही दिवसांत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशीव.
