- ऊस दरवाढीसाठी आक्रमक इशारा — शेतकरी संघटना सरकारविरोधात रणसज्ज..!

धाराशीव प्रतिनिधी (आयुब शेख )
धाराशीव: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. संघटनेचे नेते सुरेश बवटे आणि सलीम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
सन २०२३–२४ च्या हंगामातील थकबाकी रक्कम आणि सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व गुळ कारखानदारांनी जाहीर केलेल्या दरकपातीच्या विरोधात संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संघटनेची मागणी आहे की, चालू २०२५–२६ हंगामात ऊसाचा पहिला हप्ता किमान ₹३,००० प्रति टन दराने देण्यात यावा आणि मागील हंगामातील थकबाकीचे त्वरित बिल अदा करण्यात यावे. अन्यथा येत्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी धाराशिव येथे भव्य आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

नेते सुरेश बवटे म्हणाले,
“शेतकऱ्यांच्या हक्काचा दर हा केवळ मागणी नाही तर आमचा हक्क आहे. सरकार आणि कारखानदारांनी योग्य दर घोषित केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू!”
तर सलीम बनसोडे यांनी सांगितले की,
“धाराशिव जिल्ह्यातील गुळ व साखर कारखानदार शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. यापुढे ते चालणार नाही. तीन हजाराचा दर मिळेपर्यंत संघटना मागे हटणार नाही.”
या निवेदनाला तहसीलदार कार्यालयाचा २८ ऑक्टोबर २०२५ रोजीचा अधिकृत शिक्का मिळाला असून, प्रशासनाने आता याची दखल घ्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी यापूर्वीही अनेक आंदोलन उभा करणाऱ्या सुरेश बवटे आणि सलीम बनसोडे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशीव.
