- ‘महायुती’साठी प्रयत्न, पण ‘स्वतंत्र’ लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणार.

उमरगा (सचिन बिद्री, धाराशिव): येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी व्यक्त केले. तालुक्यातील बलसुर येथे पार पडलेल्या उमरगा-लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रा. बिराजदार यांनी यावेळी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. जात-पात न पाहता, सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत.”

अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असल्याचे प्रा. बिराजदार यांनी सांगितले.
- उमरगा-लोहारा तालुक्यात रस्त्यांसह अनेक मूलभूत विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे.
- लाडकी बहीण योजना तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान त्वरित देण्यात आले.
- भाऊसाहेब बिराजदार आणि बानगंगा साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळवून देण्यात आला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
महायुतीला प्राधान्य, पण तयारी स्वतंत्र लढण्याची
आगामी निवडणुका महायुतीच्या (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) माध्यमातून लढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे. मात्र, “परिस्थितीपरत्वे स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यासाठी सदैव तयार राहावेत,” असे स्पष्ट निर्देश प्रा. बिराजदार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत लहुजी शक्ती सेनेचे उमरगा तालुका अध्यक्ष राम कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
या आढावा बैठकीस राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, अशोक कारभारी, दत्ता इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे, सुभाष गायकवाड, मारुती पाटील, प्रकाशसिंह सुभेदार, गोजरताई बनसोडे, संजय जाधव, भरत बिराजदार, प्रताप महाराज, अमोल ओवंडकर, संदिपान पाटील, रणजीत गायकवाड, अजिंक्य पवार, श्रीराम जगदाळे, रवी पाटील, अभय पाटील, विजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी सचिन बिद्री,
एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव
