
गंगापूर प्रतिनिधी: अमोल पारखे
गंगापूर: गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्याने एका होतकरू तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब बंडु मनाळ (वय ३६) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण वाहेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पाणी काढताना पाय घसरला
ही हृदयद्रावक घटना वाहेगाव शिवारातील गट क्रमांक १०६ मध्ये घडली. बाबासाहेब मनाळ हे आपल्या शेतात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या अवतीभोवती तणनाशक औषध फवारणीचे काम करत होते. फवारणीसाठी लागणारे पाणी संपल्यामुळे, ते विहिरीतून दोरीच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी गेले.
याच दरम्यान, त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते थेट विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न घेता आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पत्नीचा आक्रोश, गावकऱ्यांची धावपळ
शेतात घराच्या जवळच ही घटना घडल्यामुळे त्यांच्या पत्नीच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करताच तात्काळ गावकरी घटनास्थळी धावले.
जयदीप गायकवाड, दत्तात्रय मनाळ, कल्याण मनाळ या तरुणांनी तत्परता दाखवून बाबासाहेब मनाळ यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढले. स्थानिक रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून बाबासाहेब मनाळ यांना मृत घोषित केले.
गावात शोककळा
या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
वाहेगाव येथील होतकरू आणि मनमिळाऊ तरुण शेतकरी असा अचानक जगातून गेल्याने गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि मोठा भाऊ असा मोठा परिवार आहे. मनाळ कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण वाहेगाववासीय सहभागी झाले आहेत.
प्रतिनिधी अमोल पारखे,
एनटीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.
