- कोट्यवधींचे दागिने लंपास करणारे आरोपी थेट पश्चिम बंगालमधून ताब्यात.
- ५१ लाखांहून अधिक किंमतीचे ५७२ ग्रॅम सोने स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत.
- व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून कर्मचाऱ्यांनीच केला होता १ कोटींचा अपहार.
- पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची यशस्वी कामगिरी.
AHILYANAGAR – अहमदनगर शहरातून सराफ व्यापाऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) थेट पश्चिम बंगाल राज्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५१ लाख १३ हजार ७९५ रुपये किमतीचे एकूण ५७२.७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी, फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, व्यवसाय – सोनार, रा. सावेडी रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांनी विश्वास संपादन करून, त्यांची संमती नसताना लबाडीच्या इराद्याने १ कोटी १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोउपनि संदीप मुरकुटे यांच्यासह शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, प्रशांत राठोड यांचा समावेश होता. तपास पथकाने गुप्त बातमीदार आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी पश्चिम बंगालमधील हावरा जिल्ह्यातील अमरागरी येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने तिथे धाव घेतली.
पथकाने अमरागरी, जि. हावरा येथून सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक (वय ३३), दिपनकर आरुण माजी (वय २२), अनिमेश मनोरंजन दोलुई (वय २५) आणि सोमनाथ जगन्नाथ सामंता (वय ३०) या चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांनी त्यांचे साथीदार संतु बेरा आणि स्नेहा बेरा यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याचे सांगितले. यापैकी सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक, अनिमेश मनोरंजन दोलुई आणि दिपनकर आरुण माजी या तीन आरोपींकडून ५१ लाख १३ हजार ७९५ रुपये किमतीचे ५७२.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी
