- मुरळी (उमरगा) येथे ग्रामपंचायततर्फे महिला आरोग्य शिबिर संपन्न..!
- शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न..!

धाराशीव, (दि. १२ डिसेंबर)
उमरगा, धाराशीव: गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांसह महिलांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता आहे. गावात विकासाभिमुख, विवेकी, सकारात्मक दृष्टिकोन असणारे नेतृत्व असल्यास निश्चित चांगला बदल आणि विकास होतो. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले.
मुरळी येथील ग्रामपंचायतच्या वतीने दि. १२ रोजी आयोजित महिला आरोग्य शिबिर व शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नयनाबाई कांबळे होत्या. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय राऊत, स्पर्श रुग्णालयाच्या डॉ. सुनिता चक्रवार, समुदाय आरोग्य अधिकारी भीमाशंकर पाटील, उपसरपंच शमशोद्दीन जमादार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमाणपत्र वितरण आणि आरोग्य शिबिर
मुरळी ग्रामपंचायतच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या शिलाई मशीन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण या वेळी करण्यात आले. महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत देशाचे माजी गृहमंत्री कै. शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
उपसरपंचांकडून कामांची माहिती
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच शमशोद्दीन जमादार यांनी गावातील विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले:
- मुरळी गावाने नागरिक आणि महिलांच्या सहकार्याने एका दिवसात तीन हजार झाडे लावून प्रथम क्रमांकाचे गाव होण्याचा मान मिळवला आहे.
- आमचे नेते सुरेश दाजी बिराजदार यांच्या माध्यमातून अजित दादा पवार यांच्याकडील पाठपुराव्यामुळे मुरळी गावासह महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला घरकुल मंजूर झाले.
- जलजीवन मिशनसारख्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नही दाजींनी मार्गी लावला, यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पाशा इनमदार यांनी केले. याप्रसंगी जगदीश राऊत, माजी सरपंच इम्रान पटेल, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाजली पाटील, तानाबाई सरवदे, नागनाथ पाटील, दिगंबर कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष उमाजी मंडले, विकास सोसायटी व्हाईस चेअरमन अनिसखा पटेल यांच्यासह ग्रामस्थ, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशीव.
