नळदुर्ग | प्रतिनिधी : आयुब शेख
ऐतिहासिक आणि संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नळदुर्ग शहराला प्रथमच आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळाले आहे. पोलीस उपअधीक्षक मेघना आय.एन. (IPS) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मेघना आय.एन. या सध्या आयपीएस प्रशिक्षण कालावधीत असून प्रशिक्षणादरम्यान त्यांच्याकडे नळदुर्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या नळदुर्ग शहरात काही वेळा वादग्रस्त घटना घडत असल्याने हा परिसर संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथे आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पदभार स्वीकारल्यानंतर मेघना आय.एन. यांनी स्पष्ट केले की, नळदुर्ग शहरात कायदा आणि शिस्त अबाधित राखणे हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये, गुन्हेगारी किंवा कायद्याचा भंग सहन केला जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि तातडीची कारवाई केली जाईल.
तसेच नागरिकांनी शांतता, सलोखा आणि कायद्याचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून जनजागृती मोहिमेद्वारे कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नळदुर्ग पोलीस ठाण्याला प्रथमच आयपीएस अधिकारी मिळाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, यामुळे नळदुर्ग शहरात शिस्तबद्ध आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्था व्यवस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

