(सचिन बिद्री:धाराशिव)
फुलेविचार, सामाजिक परिवर्तन आणि संविधानिक मूल्यांचा जागर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ या काव्य महोत्सवात कविता सादर करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी येथील कवी के.पी. बिराजदार यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व फुलेविचारांचे अभ्यासक विजय वडवेराव यांच्या फुलेप्रेमातून साकार झालेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा उद्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे हा आहे.
देश-विदेशातील साहित्यिक, कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणारा हा फुले फेस्टिवल जानेवारी २०२६ मध्ये पुणे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवातील काव्य सत्रात दि. ५ जानेवारी २०२६ रोजी ‘नुसतेच बुडबुडेकार’ या काव्यसंग्रहाचे कवी के.पी. बिराजदार हे निमंत्रित अध्यक्ष व कवी म्हणून सहभागी होणार आहेत.
या निवडीबद्दल आयोजक विजय वडवेराव यांनी के.पी. बिराजदार यांना निवडपत्र देऊन सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, एसटी कर्मचारी वर्ग तसेच साहित्यिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
