- पोलीस अधीक्षक रितू खोबर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!

धाराशिव, (दिनांक 30 डिसेंबर)
धाराशिव: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धाराशिव पोलिसांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक स्पष्टपणे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीवर धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोबर यांच्या स्पष्ट आदेशानुसार अवैध शस्त्रांवर कडक कारवाई सुरू असून, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. गणेश उर्फ गणेशा जंप्या भोसले (रा. काराळी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा आरोपी घरात गावठी कट्टा ठेवून कोठडी चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत त्याला रंगेहाथ पकडले. छाप्यात आरोपीकडून घातक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गुन्हा क्रमांक 489/25 नोंदवण्यात आला असून, आरोपीवर कलम 3 व 25 भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही तपासला जात आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोबर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सपौनि सुदर्शन कासार तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट इशारा असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशीव.
