(सचिन बिद्री):उमरगा (ता. ०२) :
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार तिचा उपयोग शक्य होत आहे. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान व सर्वसमावेशक बनत असले तरी मानवी बौद्धिक विकास व विचारशक्तीचा समतोल राखण्याची आव्हानेही निर्माण होत आहेत. मात्र नैतिकता, गोपनीयता आणि मानवी मूल्ये जपत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला, तर हे तंत्रज्ञान समाजासाठी दीर्घकाळ लाभदायक ठरेल, असे मत मा. अमोल भैया मोरे यांनी व्यक्त केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे शुक्रवार, २ जानेवारी रोजी शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ४१ व्या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. यावेळी मा. भानुदासराव माने व मा. रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
निजामी राजवटीच्या काळात मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व व नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा “कृत्रिम बुद्धिमत्ता युवा पिढीच्या बौद्धिक विकासासाठी तारक आहे/नाही” या विषयावर सोलापूर, धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यातील १५ संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या पात्रुडकर कस्तुरी व आदिती ढगे यांच्या संघाने प्रथम पारितोषिक (₹१०,००१), स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र पटकाविले. छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, बलसूर येथील प्रगती औसेकर व राणी भालेराव यांच्या संघास द्वितीय पारितोषिक (₹७,००१) मिळाले. श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, उमरगा येथील श्रद्धा खटके यांना वैयक्तिक उत्तेजनार्थ पारितोषिक (₹३,०००) प्रदान करण्यात आले.
भारत शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कमी होणार नाहीत, तर नव्या संधी कशा निर्माण होतील याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे सांगितले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधीर मठपती, डॉ. राम कदम, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी व राजेश्वर वाघमारे यांनी काम पाहिले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. अशोक पदमपल्ले, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. विनोद देवरकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. विनोद देवरकर यांनी केले.
