भद्रावती : (सतीश आकुलवार)
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ शाखा भद्रावतीच्यावतीने विवेकानंद महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांना आज दिनांक10 डिसेंबरला निवेदन देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष ब्रह्मदेव टाले, सचिव संजय तामगाडगे, मुख्य लिपिक सतीश मशालकर, दिपक तेलंग, श्रद्धा वऱ्हाडे, वामन अंड्रस्कर यांनी निवेदनात लिहिले आहे की, महासंघाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी सतत पाठपुरावा केलेला आहे. परंतु वेळोवेळी शासनाची वेळकाढू भूमिका असल्याने प्रश्न निकाली निघत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे कर्मचारी दिनांक 14 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामे करतील.
या आंदोलनादरम्यान शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सर्व शिक्षकेतर कर्मचारी 20 डिसेंबरपासून बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे लिहीले आहे. सातव्या वेतन आयोगात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, महाविद्यालयातील रिक्त असलेली शिक्षकेत्तर पदे तात्काळ भरण्यासाठी मान्यता देणे, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे इत्यादी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे.