“पत्रकारितेत माणुसकी जिवंत” — चुकून मिळालेले २० हजार प्रामाणिकपणे परत
छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे प्रामाणिकतेचा एक आदर्श नमुना समोर आला आहे. जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी बँक व्यवहारात चुकून जास्त मिळालेले तब्बल २० हजार रुपये प्रामाणिकपणे परत करून पत्रकारितेतील माणुसकी आणि नैतिकता जपल्याचे दाखवून दिले.
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास सावळदबारा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बी.सी. केंद्रावर पोलीस पाटील विलास कुल्ले यांच्या मार्फत व्यवहार करताना गोकुळसिंग राजपूत यांनी १० हजार रुपये मागितले होते. मात्र व्यवहार करताना तांत्रिक चुकीमुळे १० हजार रुपये खात्यात जमा (क्रेडिट) झाले आणि त्याचबरोबर १० हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. त्यामुळे एकूण २० हजार रुपये शिल्लक राहिले.
रात्री मोबाईलवर मेसेज तपासल्यानंतर ही बाब लक्षात येताच, गोकुळसिंग राजपूत यांनी प्रामाणिकपणे पुढाकार घेत दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जाऊन संबंधित पोलीस पाटील विलास कुल्ले यांना बोलावून घेतले. शाखा व्यवस्थापक प्रशांत फुसे यांच्या उपस्थितीत त्यांनी चुकून मिळालेले २०,००० रुपये परत केले.
या घटनेमुळे “आजच्या काळातही प्रामाणिकता आणि माणुसकी जिवंत आहे” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, पत्रकारितेच्या क्षेत्रातही नैतिक मूल्ये जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गोकुळसिंग राजपूत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजी नगर
