CH.SAMBHAJINAGAR | सिरसगाव शिवारातील शिवना नदीपात्रात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंगावर जखमांच्या खुणा असल्याने हा मृत्यू संशयास्पद मानला जात असून पोलीस तपास सुरू आहे.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शौचास गेलेल्या नागरिकांना नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसला. या मृत तरुणाची ओळख गणेश अंबादास शिरसाठ (वय २८, रा. सिरसगाव) अशी पटली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
मृताच्या अंगावरील कपडे फाटलेले असून शरीरावर चाव्याच्या जखमांसारख्या खुणा आढळून आल्या आहेत, त्यामुळे या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. गणेश हा कुटुंबातील एकुलता एक आणि अविवाहित मुलगा होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते, सध्या तो आणि त्याचे वडील दोघेच घरी राहत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अमोल पारखे, एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापूर.
