गंगापूर प्रतिनिधी : अमोल पारखे

नेवरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेवरगाव येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, घटणारे वनक्षेत्र आणि बदलते हवामान यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

“एक झाड म्हणजे भविष्यातील जीवन” हा संदेश देत मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात गंगापूर पंचायत समितीच्या सदस्या सौ. कांता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शुभम सुपेकर, फॅन्सीस रूपटक्के, विमल शिरसाठ, सुशीला दुशिंग, आशा दुशिंग, कल्पना दुशिंग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि जीवन देणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नेवरगावकरांनी हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी आपला संकल्प पुन्हा एकदा दृढ केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *