३६ वर्षांची निष्ठा आणि ‘जेलवारी’ केलेल्या आक्रमक नेतृत्वासाठी सर्वपक्षीय रेटा; अणदूर गटासह संपूर्ण जिल्ह्यातून रणांगण सज्ज*
तुळजापूर/धाराशिव:
धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीवरून जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे आक्रमक, तळागाळातील आणि कडवट निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळख असलेले राज अहमद पठाण यांचे नाव आघाडीवर आल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांची अक्षरशः झोप उडाली आहे. पठाण यांच्या नावाचा धसका केवळ विरोधकांनीच नव्हे, तर तालुक्यातील काही ‘स्वकीयांनी’ देखील घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून, त्यांच्या नियुक्तीच्या हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे.
धारदार नेतृत्व आणि धगधगता संघर्ष*
राज अहमद पठाण म्हणजे गेल्या ३६ वर्षांपासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन लढणारा एक निखारा आहे. १९९७ पासून सलग चार वेळा जिल्हा परिषद लढवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. २००२ ते २००७ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेत शिवसेनेचा ‘बुलंद आवाज’ म्हणून गटनेते पद गाजवले आहे. पक्ष वाढवण्यासाठी आणि शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी ७ महिने ६ दिवस जेलची हवा खाल्ली, पण कधीही तडजोड केली नाही. त्यांचा हाच आक्रमक बाणा आता प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अणदूरच्या डॉ. कानडेंसह दिग्गजांची ‘फिल्डिंग’
पठाण यांच्या नियुक्तीसाठी अणदूर जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी रणशिंग फुंकले असून, त्यांनी पठाण यांच्या नावाचा ठाम प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शामलताई वडणे, सौ. जयश्री कोळी, संगीता गवळी यांसह तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडे पठाण यांच्या नावासाठी लेखी गळ घातली आहे.
पठाण यांच्या नावाची मोठी जमेची बाजू:
- प्रस्थापितांना आव्हान: पठाण सभागृहात आले तर सरकारच्या विरोधात आणि जनहितासाठी ते आक्रमक भूमिका घेतील, या भीतीने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
- मुस्लिम समाजाचा बुलंद चेहरा: मुस्लिम समाजातून असूनही ३६ वर्षे अखंड शिवसैनिक म्हणून काम केल्याने अल्पसंख्याक समाजात शिवसेनेची क्रेझ वाढवण्यासाठी ते ‘ट्रम्प कार्ड’ ठरणार आहेत.
- जिल्हाभर वलय: केवळ तुळजापूरच नव्हे, तर उमरगा, लोहारा, भूम, परंडा आणि कळम या सर्व तालुक्यांत पठाण यांचा मोठा जनसंपर्क आणि दरारा आहे.
‘किंगमेकर’च्या भूमिकेत खा. ओमराजे अन् आ. कैलास पाटील*
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, सुधीरजी कदम, अमोल गवळी, संजय भोसले, सुनील जाधव, पिंटू बेडगे, कृष्णाजी मोरे, आणि कचरू भाऊ सकट यांसारख्या शेकडो शिलेदारांनी पठाण यांच्यासाठी कंबर कसली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवर राज अहमद पठाण यांच्या नावावर ‘सकारात्मक मोहोर’ उमटण्याची दाट शक्यता असून, त्यांच्या नावाच्या नुसत्या चर्चेनेच धाराशिवच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
“राज अहमद पठाण यांनी ३६ वर्षे निष्ठेने शिवसेनेची सेवा केली आहे. आंदोलने, उपोषणे आणि जेलवारी सोसणारा हा नेता जेव्हा जिल्हा परिषदेत पाऊल ठेवेल, तेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळेल आणि विरोधकांच्या सत्तेला सुरुंग लागेल, यात शंका नाही.”
— शिवसैनिक व समर्थक, तुळजापूर तालुका.आता खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील हे एका आक्रमक योद्ध्याला संधी देऊन जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
