• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात व्याख्यानमालेचे चौदावे पुष्प अर्पण.
  • “संविधानामुळे देशात कायद्याचे राज्य”; पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांचे प्रतिपादन.
  • २ ते १४ एप्रिल दरम्यान महामानवाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञ वक्त्यांकडून सखोल प्रकाश.
  • महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन; शिवजयंतीलाही व्याख्यानमालेचा संकल्प.

JALNA | जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २ एप्रिलपासून सुरू असलेल्या विशेष व्याख्यानमालेचा समारोप पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल भाऊ म्हस्के होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार दिले असून, नागरिकांनी आपल्या जबाबदारीचीही जाणीव ठेवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. राहुल भाऊ म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सलग १४ दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत १४ तज्ज्ञ वक्त्यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक कार्यावर प्रकाश टाकला आहे. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही अशीच व्याख्यानमाला सुरू करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पहारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमरसिंग धवलिया यांनी मानले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राहुल गवई,

जाफराबाद, जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *