प्रलंबित मागण्या आणि थकीत वेतनासाठी जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेचा भव्य मोर्चा.
जुलै ते सप्टेंबर २०२५ चे मानधन त्वरित देण्याची आग्रही मागणी.
दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन न झाल्यास मुंबईतील आरोग्य भवनावर धडक देण्याचा इशारा.
एकल महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सीटू संघटनेचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल.
AHILYANAGAR | अहिल्यानगर येथे आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि थकीत वेतनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांना निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडण्यात आल्या. राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचरांना मागील अनेक महिन्यांपासून वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांचे मानधन अद्याप न मिळाल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. सीटूचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रवीण सोनवणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, यातील बहुतेक महिला एकल असून तुटपुंज्या पगारावर काम करतात; त्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेलाच त्यांचे वेतन व्हायला हवे.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये थकीत मानधन जमा करणे, पगारवाढीची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील डे-शिफ्ट पद्धत बंद करणे, सन्मानाची वागणूक मिळणे, गणवेश व भाऊबीज भत्ता आणि ‘प्रधानमंत्री अपघात विमा योजना’ लागू करणे यांचा समावेश आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्षा कल्पना धनवटे, कॉम्रेड प्रवीण सोनवणे, सविता काळे, छाया थोरात, प्रतिभा सोनवणे, कांता गायकवाड, मंदाताई अस्वले, उषाताई केदारी, प्रतिभा केसभट, सुनिता गागरे, लता लिंगे, अनिता हजारे, रोहिणी सोनवणे आणि रोहिणी धस यांच्यासह मोठ्या संख्येने महिला परिचर सहभागी झाल्या होत्या. प्रशासनाने दखल न घेतल्यास मुंबईतील आरोग्य भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रतिनिधी, अहिल्यानगर
