लातूर : चाकूर येथील अष्टमोड शिवारात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हणमंत व्यंकटी येरवे (42) असे मयत नाव आहे त्याचे लातूर रोड येथील शबना मासूलदार हिच्याशी संबंध होते परिणामी शबाना, मुलगी आणि पती हे गत दहा वर्षापासून विभक्त राहत होते. कालांतराने हणमंत हा शबानाला दारु पिऊन त्रास देऊ लागला. शबाना सततच्या त्रासाला कंटाळली होती. त्यातच शबानाचे संतोष घाडगे यांच्याशी सूत जुळले. हणमंत यांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून शबाना आणि संतोष यांनी हणमंत येरवे याचा काटा काढायचा कट रचला. त्यानुसार शबाना हणमंतला रविवारी सायंकाळी चाकूर येथे घेऊन गेली. तेथून आष्टा शिवार्यातील घरणी रेल्वे स्टेशन समोर ते गेले. त्यावेळी शबानाने मोबाईलवरून एका व्यक्तीशी संपर्क केला. तिथून ते मोहदळ भागातील अडवळ वळणावर गेले. तेथे दबा धरून बसलेल्या संतोष घाडगे आणि लक्ष्मण डांगे यांनी हणमंत येरवे याच्या डोक्यात लोखंडी रोंडने जबर वार करून हत्या केली. याबाबत पोलिसांनी तपासणी चक्रे गतिमान करत बारा तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.