प्रतिनिधी : आयुब शेख | नळदुर्ग

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवात मानाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या जतन व संवर्धनाच्या कामांना आता प्रत्यक्ष गती मिळाली असून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप, ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्य वैशिष्ट्य अबाधित ठेवत त्याचा पर्यटन विकास करण्याच्या उद्देशाने संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

याअंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग किल्ल्याला भेट देत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेण्यात आला तसेच संवर्धनाची कामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी आतापर्यंत सुमारे साडेसहा ते सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात मुख्य तटबंदी, बुरुज, संरक्षण भिंतींची दुरुस्ती, तटांवर वाढलेले गवत व झाडेझुडपे हटविणे, तटबंदीतील भगदाडे व मोकळ्या जागा शास्त्रोक्त पद्धतीने भरणे अशी कामे सुरू आहेत.

यासोबतच नळदुर्ग किल्ल्याच्या परिसराचा आणि जगप्रसिद्ध नर-मादी धबधबा परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करून पर्यटकांसाठी अधिक आकर्षक सुविधा उभारण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे. भविष्यात पर्यटन वाढल्यास स्थानिक रोजगार निर्मिती, व्यावसायिक संधी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नळदुर्ग किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून या भागाच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक अस्मितेचा साक्षीदार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

यावेळी नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे तसेच स्थानिक पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *