श्रीरामपूर येथे प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत टेम्पोसह एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 16 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रणजीत जाधव आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे आर. डी. ढोकणे व विनोद उंडे हे अवैध वाळू वाहतुकीची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
अभी राऊत, रा. भेर्डापूर, हा प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष नदीपात्राजवळ कारवाई केली. यावेळी वाळूसह टेम्पो आढळून आला.
या प्रकरणी वाहन चालक रोहित बाळासाहेब राऊत, वय 26 आणि वाहन मालक अभिजीत बाळासाहेब राऊत, वय 24, दोघेही रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर, यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी 5 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा टेम्पो आणि 10 हजार रुपये किंमतीची वाळू, असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 312/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
