- भालोद महाविद्यालयात सर्पसंवर्धन कार्यशाळा
- विद्यार्थ्यांना सापांविषयी वैज्ञानिक माहिती
- विषारी व बिनविषारी सापांची ओळख
- सर्पदंशावरील प्रथमोपचाराचे मार्गदर्शन
- सर्पांविषयी गैरसमज दूर करण्याचे आवाहन
- सापांना न मारता सर्पमित्रांशी संपर्काचे आवाहन
JALGAON | भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि सर्प संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हा कार्यशाळेचा उद्देश होता.
प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय कोल्हे यांनी सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र असून अन्नसाखळीत त्यांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले. साप उंदीर आणि किड्यांची संख्या नियंत्रित करून शेतीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना धामण, अजगर, मांडूळ, गवत्या, हरणटोड आणि पाणसाप यांसारख्या बिनविषारी सापांची तसेच किंग कोब्रा, इंडियन क्रेट, रसेल वायपर, भारतीय नाग, मलबार पिट वायपर, पट्टेरी मण्यार आणि बांबू पिट वायपर यांसारख्या विषारी सापांची माहिती दिली.
सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे यांनी सापाच्या विषापासून अँटी-स्नेक व्हेनम तयार केले जाते, अशी माहिती दिली. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिनाक्षी वाघुळदे यांनी केले.
फिरोज तडवी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
