कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील मॅडम, तर प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख मेहबूब शेख यांची होती. प्रारंभी सरस्वती माता आणि कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कै. महाजन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
वर्षभरातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई महाजन, उपाध्यक्ष सुभाष महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, शामकांत महाजन, रामा निळे, धनराज माळी, चिटणीस गंगाराम कोळी, मुख्याध्यापक आर. जे. महाजन, शिक्षकवृंद आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सरोज पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा, असे आवाहन केले. केंद्रप्रमुख मेहबूब शेख यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. पी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाय. बी. सपकाळे यांनी केले.
