यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील गरीब कुटुंबातील शेतमजुरी करणाऱ्या अमीन हसन तडवी याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत तो एसआरपीएफ पोलीस झाला असून वरणगाव येथे सेवेत रुजू झाला आहे.
अमीन हसन तडवी यांचे आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई-वडिलांना मदत म्हणून अमीनही शेतात मजुरी करत होता. मात्र परिस्थितीवर मात करत त्याने ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर जळगाव येथील एम. जे. कॉलेजमधून एमए पूर्ण केले.
एमएचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले. नुकतेच त्याला कामावर हजर राहण्याचे पत्र मिळाले असून तो वरणगाव येथे एसआरपीएफ पोलीस म्हणून रुजू झाला आहे.
सावखेडा सिम येथील अमीन हसन तडवी हा महबूब गंभीर तडवी यांचा नातू आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंबावरील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होणार असून, गावात आणि परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
