यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या आशा सेविकांसाठी तालुका क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रक्षाबंधनानिमित्त आशा सेविकांना वर्षभर मोफत चहा, कॉफी आणि पिण्याच्या पाण्याची बाटली देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
यावल तालुक्यात सुमारे २१५ आशा सेविका कार्यरत असून, मानसेवी कर्मचारी म्हणून त्या ग्रामीण भागात आरोग्यविषयक विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विविध आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणताना आशा सेविकांची महत्त्वाची भूमिका असते.
अल्प मानधनावर काम करत असतानाही आरोग्यसेवेत सातत्याने योगदान देणाऱ्या आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या भावनेतून नरेंद्र तायडे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
आशा सेविकांनी आपले ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना मोफत चहा किंवा कॉफी तसेच पाण्याची बाटली मिळणार आहे. ही सुविधा वर्षभर सुरू राहणार आहे.
२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवसापासून यावल ग्रामीण रुग्णालयाजवळील श्री. भरत बारी यांच्या चहाच्या हॉटेलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
