यावल तालुक्यातील मोहराळे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत पांढरीवस्ती येथे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही समस्या न सुटल्याने आदिवासी महिला आणि नागरिकांनी यावल पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढत ‘भिक मांगो’ आंदोलन केले.

पांढरीवस्ती येथे कूपनलिकेवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र कूपनलिकेची मोटर जळाल्याने गेल्या काही काळापासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिला आणि नागरिकांची मोठी वणवण सुरू आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवकांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र ठोस कारवाई न करता वेळकाढूपणा आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संतप्त आदिवासी महिला आणि नागरिकांनी पंचायत समिती कार्यालय गाठले.

बिरसा महामानव संघटनेच्या वतीने बिरम बारेला यांच्या नेतृत्वाखाली ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. महिलांनी रिकामे हंडे घेऊन पिण्याच्या पाण्याची मागणी केली. आंदोलकांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कूपनलिकेची मोटर तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रश्न सुटत नसल्याने आदिवासी ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *