कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात मनपाडळे परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. रानडुकरे, गवे आणि कोल्ह्यांकडून ऊस, भुईमूग यासह विविध पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मनपाडळे परिसरातील शेतशिवारात रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप तसेच गव्यांचा वावर वाढला आहे. रानडुकरांकडून पिकांची मुळे उखडली जात आहेत, तर गव्यांकडून ऊस आणि अन्य पिके तुडविली जात आहेत. महिन्यांच्या मेहनतीने उभी केलेली पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक बनले असून, वन्यप्राण्यांचा अचानक सामना होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. मनुष्यवस्तीच्या दिशेनेही त्यांचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे वारंवार मागणी करूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
