उस्मानाबाद : उमरगा येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर अतिरिक्त पदभारामुळे गेल्या दीड वर्षांपासून उस्मानाबाद येथेच जास्त वेळ असतात. त्यामुळे पालिकेचे प्रशासक म्हणून त्याच दर्जाचे दुसरे कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की. सार्वत्रिक निवडणुकी करिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य नसल्याने व मुदत संपल्याने नगर परिषदेवर प्रशासक नियुक्ती करण्याबाबतचे पत्र नगरविकास विभागाने काढले आहे. यानुसार उमरगा नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे जिल्हा प्रशासन अधिकारीपदाचा देखील अतिरिक्त पदभार आहे. यामुळे ते गेल्या दीड वर्षापासून उस्मानाबाद मुक्कामी जास्त वेळ असतात. परिणामी उमरगा शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक पदाची जबाबदारी ते योग्यरित्या पाडू शकणार नाहीत.
यासाठी प्रशासक म्हणून त्यांच्याच दर्जाच्या अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, महासचिव बाबूराव गायकवाड, तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार, प्रकाश कांबळे, बाबा सोनकांबळे, संतोष गायकवाड, शाक्यदीप कांबळे, मल्हारी सुरवसे, तमा गारगुटे, तमा शिंगशेट्टी, प्रशांत भालेराव, सूरज मोरे, अनिकेत कांबळे आदींच्या सह्या आहेत.
सचिन बिद्री-उमरगा, उस्मानाबाद