जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात बोरावल-टाकरखेडा शिवारात शेतमजूर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि शेतमजूर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी यावल शहरातील पाच ते सात महिला बोरावल-टाकरखेडा शिवारात शेतमजुरीसाठी गेल्या होत्या. दुपारी घरी परतण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने महिलांना शिवीगाळ केली आणि एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. त्यानंतर तो दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेला.
या घटनेची माहिती महिलांनी यावल पोलीस ठाण्यात देत तक्रार नोंदवली. घटनास्थळी सोडलेली दुचाकीही पोलिसांकडे जमा करण्यात आली असून, पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.
