♦️ राजोरे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांचा गौरव
♦️ एस्पायर फाउंडेशन नाशिककडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
♦️ डिजिटल अध्यापनातून शैक्षणिक गुणवत्तेला चालना
♦️ क्यूआर कोडयुक्त साहित्याची तालुकास्तरावर विशेष प्रशंसा
♦️ श्रमसृष्टी परसबागेतून निसर्गपूरक शिक्षणाचा वस्तुपाठ
♦️ लोकसहभागातून शाळेचा कायापालट करण्यावर भर
JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोरेचे उपक्रमशील मुख्याध्यापक रवींद्र प्रकाश पाटील यांना नाशिक येथील एस्पायर फाउंडेशनचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षणिक नवोपक्रम, डिजिटल अध्यापन आणि सामाजिक बांधिलकीतून शाळेचा कायापालट केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी एस्पायर फाउंडेशनच्या वतीने या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा राजोरे येथे मुख्याध्यापक रवींद्र प्रकाश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक नावीन्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी त्यांनी ‘निपुण दिशा’ उपक्रमांतर्गत क्यूआर कोडयुक्त शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली. या उपक्रमाचे तालुकास्तरावर विशेष कौतुक झाले. तसेच विद्यार्थ्यांना निसर्ग आणि श्रमाचे महत्त्व समजावे, यासाठी ‘श्रमसृष्टी परसबाग’ विकसित करून निसर्गपूरक शिक्षणाचा आदर्श घालून दिला.
विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कापसाच्या वाती बनवणे, बांबूच्या टोपल्या विणणे आणि पर्यावरणपूरक गणपती बनवणे यांसारखे कौशल्य विकासाचे उपक्रम व कार्यशाळा राबवण्यात आल्या. याशिवाय दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळवून देणे आणि शाळेसाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग उभा करणे, अशी महत्त्वपूर्ण कामेही त्यांनी केली आहेत.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर नेण्यासाठी केलेल्या या कार्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती राजोरे, पालक, परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून रवींद्र पाटील यांचे कौतुक केले जात आहे.
“हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून आपणा सर्वांचा आहे. मी केवळ प्रतिनिधित्व केले,” अशी भावना रवींद्र पाटील सरांनी व्यक्त केली.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
