♦️ राजोरे शाळेत स्त्रीशक्तीचा जागर उत्साहात संपन्न
♦️ महिला पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी तडवी यांचा गौरव
♦️ सपना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
♦️ विद्यार्थिनींच्या मूकनाट्यातून सामाजिक विकृतींवर प्रहार
♦️ परसबागेतील भाजीपाला तोडणीत महिला पोलिसांचा सहभाग
♦️ गुड टच-बॅड टचबाबत विद्यार्थ्यांना केले जागरूक
JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोरे येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘स्त्री शक्तीचा जागर’ हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी तडवी आणि सौ. सपना सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रभावी मूकनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील ‘श्रमसृष्टी मुक्ताई परसबागे’च्या पाहणीने आणि भाजीपाला तोडणीने झाली. महिला पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी तडवी आणि सपना सोनवणे यांच्या हस्ते वांगी, भेंडी, गवार, मेथी आणि कोथिंबीर या भाजीपाल्याची तोडणी करण्यात आली. शाळेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे कष्ट आणि निसर्गाशी जोडलेली परसबाग पाहून उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सागरभाऊ कोळी आणि ग्रामस्थांशी या उपक्रमाविषयी चर्चा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी आजची स्त्री एसटी चालकापासून ते चंद्रयान मोहिमेपर्यंत विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत असल्याचे सांगितले. महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा, हाच ‘स्त्री शक्तीचा जागर’ उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थिनींनी स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, अंधश्रद्धा, हुंडाबळी, गरिबी आणि लिंगभेदभाव यांसारख्या सामाजिक विकृतींवर आधारित मूकनाट्य सादर केले. जगदंबा मातेच्या रूपातून स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश त्यांनी केवळ हावभावांतून दिला. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींच्या कलेचे कौतुक म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत आणि ‘भारत माता’ विषयावरील भाषणही लक्षवेधी ठरले.
पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी तडवी यांनी या शाळेत पुन्हा विद्यार्थी बनून दाखल व्हावे, परसबागेत काम करावे आणि गुरुजींकडून शिस्तीचे धडे घ्यावेत, अशी इच्छा व्यक्त केली. तर सौ. सपना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वतःचे रक्षण कसे करावे आणि समाजात वावरताना सतर्क कसे राहावे, याबाबत त्यांनी व्यावहारिक दाखले दिले. शाळेची गुणवत्ता, शिक्षकांची मेहनत आणि दातृत्वाच्या भावनेचेही त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता पाटील, सदस्या सुनंदाताई पाटील, माधुरी कोळी, शिक्षणप्रेमी भाग्यश्री महाजन, पूजा बिराडे, सरला जावळे यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षिका वैशाली पाटील यांनी केले. आभारगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
