बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहिरा परिसरात शेतामध्ये बिबट्याचे पायांचे ठसे आढळले असून, काही शेतकऱ्यांनी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचेही सांगितले आहे. वनविभागाने पाहणी करून सतर्कतेचा इशारा दिला असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सायंकाळनंतर शेतात जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेषतः शेतातील जनावरांना चारा आणि पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवसा शेतातील कामे करतानाही शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागत असून, बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

वाहिरा गावचे सरपंच संभाजी गाडे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये, सोबत काठी आणि टॉर्च ठेवावी, लहान मुलांना शेतात पाठवू नये, तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वाहिरा परिसरातील बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच संभाजी गाडे यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच वनविभागाने या परिसरात नियमित गस्त घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *