राहुल वाडकर…
सांगली :- शेतकरी आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N D Patil) यांचे साेमवारी (दि.१७) निधन झाले. आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कष्टकरी, वंचित, कामगारांचे आधारवड म्हणून ओळख प्रा. एन. डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. मात्र, एन.डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि.सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.