पालघर : काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आठवडाभर पडणाऱ्या पावसाने थैमान घातले होते. मध्यंतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.त्यामुळे सर्व सामान्यांना थोडा दिलासा मिळाला होता.परंतु शनिवार पासुन पुन्हा सुरु झालेल्या संततधार पावसाने सर्वत्र दैना उडवली आहे.मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काहींचे संसार उघड्यावर आणले आहेत.शनिवार राञी पासून पडत असलेल्या पावसाने घरांचे मोठे नुकसान झाले आहे.माञ कुठलीही जिवितहानी झालेली नाही. नुकसानीचे पंचनामे करुन शासनाच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
जव्हार कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गरदवाडी गावठाण मधील विधवा महिला गंगू शंकर सांबरे (वय ५०) या महिलेच्या घरांची भिंत पडुन सिमेंटचे पञे फुटल्याने घरातील साठवलेले धान्य भिजुन कुटुंबाचे नुकसान झाले आहे.विधवा महिलेची आधीच हलाखीची परिस्थिती असताना शनिवारी झालेल्या पावसाने महिलेचा संसार उघड्यावर आला आहे.हि विधवा महिला तिची मुलगी,तिची आई यांचा सांभाळ करते.परंतु पावसाने तिचे कुटुंब उघड्यावर आणल्याने तिची तारांबळ झाली आहे.
तसेच कोरतड ग्रामपंचायत मधील डुंगाणी येथील चिंतामण गोपाळ चौधरी.(वय ४५) याचे शनिवारी झालेल्या पावसाने घराची भिंत ,छप्पर राञी १.३० च्या सुमारास पडून घराचे नुकसान झाले. त्यात भिंत व कौले फुटुन नुकसान झाले आहे. माञ जिवितहानी टळली आहे.अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांनी मदतीची मागणी केली आहे.
"माझ्या घराची भिंत पडून, सिमेंट पञे फुटून साठवलेले धान्य भिजुन पावसाने मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.पंचनामे करुन शासनाची मदत मिळावी."
गंगू शंकर सांबरे. विधवा महिला,गरदवाडी गावठाण(जव्हार)
प्रतिनिधी
भरत गवारी (जव्हार)