सचिन बिद्री:उस्मानाबाद
उमरगा पंचायत समितीतील १८ गणांच्या मतदारसंघाची आरक्षण सोडत (दि. २८)रोजी पंचायत समिती सभागृहात गुरूवारी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार शिवाजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या यावेळी लहान मुलाच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढून मतदारसंघाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीच्या १८ गणांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सहा, सर्वसाधारण महिला पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन, अनुसूचित जाती सर्वसाधारण एक, अनुसूचित जाती महिला दोन असे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेच्या तुरोरी गटातील तुरोरी व मुळज दोन्हीही पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बलसूर गटासह माडज व बलसूर गण महिलांसाठी राखीव झाला आहे.तालुक्यातील पंचायत समिती आरक्षण सोडतीमध्ये मुळज गणासाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण, तुरोरी, जकेकूरसाठी अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी नाईचाकूर, डिग्गी,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी भुसनी, बलसूर, खुला सर्वसाधारण डाळिंब, पेठसांगवी, येणेगूर, तुगाव, केसरजवळगा, कुन्हाळी तर खुला सर्वसाधारण महिलेसाठी माडज, गुंजोटी, आलूर, तलमोड, कदेर असे आरक्षित झाले आहेत.