पुणे : शिरूर भाजपाचे माजी आमदार बाबुराव काशिनाथ पाचर्णे यांचे ७१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. दीड वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. पुण्यातील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. दीड वर्षाच्या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतरही अवयवही निकामी होत गेले.शिरूर येथील खाजगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
पाचर्णे यांच्यावर उपचार चालू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील, बाळा भेगडे, भीमराव तापकीर, राहूल कुल ,माधुरी मिसाळ सुनील कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासमवेत पाचर्णे यांची शिरूर रूग्णालयात भेट घेतली होती.शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, दादापाटील फराटे हे यावेळी उपस्थित होते.शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी या छोट्या गावात शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. सन १९७८ ते ८४ या काळात ते ग्रामपंचायत सदस्य होते. २८ जानेवारी १९८५ ते २२ जुलै १९९३ अशी सलग ८ वर्षे बाजार समितीचे सभापतीपद त्यांनी भुषविण्याची संधी त्यांना मिळाली. १९९३ ला झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत ते पुन्हा संचालक म्हणून निवडून आले.१९९५ ला त्यांनी प्रथम विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना केवळ ६७८ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक असलेल्या पाचर्णे यांनी १९९७ ते ९९ या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले. काही काळ त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदही भुषविले.