हिंगोली : ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला हक्काचे पक्के घर असावे यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली त्याच अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील सहा नगरपरिषदा आणि पाच नगरपंचायती अंतर्गत घरकुल योजनेचा डीपीआर मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाचे सुरवातीचे हप्ते मंजूर करून देण्यात आले त्यानंतर हप्त्याची रक्कम न मिळाल्याने अनेक घरकुल धारकांचे घरकाम अपुरे राहिले होते.थकीत हप्त्यांसाठी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय स्तरावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री डॉ.हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता तसेच राज्यशासनाकडे सुद्धा पाठपुरावा केल्यानंतर सुरवातीला कळमनुरी , हिंगोली येथील शहरी आवास योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाला. त्यानंतर आता हिंगोली लोकसभा मतदार संघातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील शहरी योजनेचा केंद्र सरकारच्या हप्त्यास मंजूरी देण्यात आली असून शहरातील एकूण १२१५ लाभार्थ्यांचे घरकुल प्रकल्प ३६ व्या सभेमध्ये मंजूर झाले होते . त्यानुसार सुरवातीला १२१५ घरकुलांसाठी ४० हजार रुपया प्रमाणे ४ कोटी ८६ लाख रुपये मिळाले होते मध्यंतरी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प असल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम थांबवावे लागले होते, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा पाठपुरावा करुन मागणी लावून धरली त्यानंतर राज्य शासनाचा हप्ता ७ कोटी २९ लाख आणि आता केंद्र सरकारचा हप्ता ६ कोटी ६० लक्ष ६० हजार रुपये प्राप्त झाल्यानंतर थेट १२१५ लाभार्थ्यांच्या खात्यावर सर्व रक्कम जमा करण्यात येणार आहे.यामुळे हिमायतनगर येथील घरकुल लाभार्थ्यांना स्वतः चे घर मिळणार यामुळे सर्व लाभार्थ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.