सांगली , राहुल वाडकर
सांगली : कुपवाड रस्त्यावरील सुतगिरणीजवळील झेंडा चौकात एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून तरूणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यात अमोल अर्जुन जानकर (वय २१ रा. यशवंतनगर) हा गंभीर जखमी झाला. भर दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली.
अभिषेक मदन गुरव (२२, रा. आनंदनगर, कुपवाड) आणि अनिस यासीन मुजावर (१९, संजयनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. एक अल्पवयीन मुलगाही ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जखमी अमोल जानकर कुटुंबियांसह यशवंतनगर येथे राहतो. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तो मित्रांसह कुपवाड सूतगिरणीजवळील झेंडा चौकात थांबला होता. काही अंतरावर बांधकामाच्या ठिकाणी संशयित गुरव, मुजावर थांबले होते. त्यांच्या किरकोळ कारणातून वाद सुरू होता. त्यावेळी अमोल जानकर याने त्यांच्याकडे पाहिले. यातून संशयितांना राग आला. त्यांनी अमोल जानकर याला गाठले. तिघांनी मिळून जानकर याला शिवीगाळ केली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयित अभिषेक गुरव याने तलवारीने जानकर याच्या डोक्यात हल्ला केला. दोन वार वर्मी लागल्याने अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर अन्य साथीदारांनी दमदाटी करत शिवीगाळ केली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व संजयनगर पोलिसाचे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणाऱ्या संशयित तरुणांना ताब्यात घेतले. जखमी जानकर याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.