पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे वि. वि. बोकील स्मृती साहित्य पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहास जाहीर झाले आहे. रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 12 सप्टेंबर रोजी पुण्यातील एस एम जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते आणि मसापचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्रवेशिका आल्या असून बालसाहित्य विभागात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या कवितासंग्रहाला उत्कृष्ट बालसाहित्य म्हणून बालसाहित्यात मानाचा समजला जाणारा वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार प्रतिष्ठानचे कार्यवाह उध्दव कानडे यांनी जाहिर केला असून त्यांच्या काव्यसंग्रहास २०२१ सालचा हा दुसरा पुरस्कार आहे. या काव्यसंग्रहासाठी २०२१ सालचा हा मानाचा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने उत्कृष्ट बालसाहित्य म्हणून जाहीर केले असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर यांचा वाघोबाचा मोबाईल हा काव्यसंग्रह! दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. प्रसिद्ध बाल साहित्यिक सचिन बेंडभर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साहित्यलेखनातील या महत्वपुर्ण योगदानाबद्दल सचिन यांना आजपर्यंत विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर साहित्य अकादमीकडून राष्ट्रीय सेमिनारसाठी गुजरातमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे कथासत्रामध्येही त्यांनी उपस्थिती लावली आहे. शिवांजली साहित्यपीठ जुन्नर येथे होणा-या शिवांजली बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.