🔸राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना दुसरीकडे मात्र अतिवृष्टीच्या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यात अनेक दिवस उलटूनही सरकारकडून कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशात आज अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावल्याचेच म्हणाले लागेल. कारण राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त 19 लाख शेतकऱ्यांना सुमारे 3 हजार 501 कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यात मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत या नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईनुसार, जालना जिल्ह्यातील 2,311.79 या बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 71,84,000 ची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, त्याचप्रमाणे परभणीतील 1,179 बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 60,34,000, हिंगोलीतील 1,13,620 बाधित क्षेत्रासाठी 157 कोटी 4,52,000, नांदेड 5,27,491 बाधित क्षेत्रासाठी 717 कोटी 88,92,000, लातूरमधील 27.425 बाधित क्षेत्रासाठी 37 कोटी 30,83 आणि उस्मानाबादमधील 66,723 बाधित क्षेत्रासाठी 90 कोटी 74,36,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्यामुळे सरकारने त्याच्या मदतीसाठी जीआर काढला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनाने आता बळीराजाचे संकटही दूर होत आहे असेच म्हणावे लागेल.