जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन…
गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अध्यक्षतेखाली १ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर तसेच वृद्धापकाळात होणारे आजार व त्यावरील उपाय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे कायदे व त्यांचे अधिकार या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
सहयोग हॉस्पिटल व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वृद्धापकाळात होणारे आजार व त्यावरील उपाय या विषयावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे कायदे व त्यांचे अधिकार याविषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. व्ही. पिंपळे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथील चमू पथनाट्य सादर करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ हार्ट सर्जन डॉ. प्रमेश गायधने व महिला बँकेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.