सांगली : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या संशयावरून महिलेला डांबून ठेवण्याची घटना जत येथील विठ्ठलनगर (ताड वस्ती) येथे गुरुवारी घडली. गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जतमधील ताडवस्ती येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता एक महिला मुलांना घेऊन जात असताना दिसून आली. तिला काही महिलांनी पकडून ठेवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या महिलेकडे चौकशी केली. ही महिला शेगाव (ता. जत) येथील होती. ती भंगार गोळा करत असताना तेथील चार महिलांनी तिला पकडून मारहाण केली. तसेच ती मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील असल्याचे समजून डांबून ठेवल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंद करण्यात आला. त्यानुसार जत पोलिसांनी अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.