आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा भाकरीसाठी संघर्ष
नांदेड : नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला आणि कर्जाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या करून घरातील कर्त्या पुरुषांनी जगण्यातून सुटका करून घेतली असली तरी मागे असलेल्या पत्नी व लेकरा बाळांच्या भाकरीसाठी संघर्ष सुरू झाला आहे.
नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदीप पट्टेकर याने नापिकी व कर्जाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबप्रमुखाच्या अशा अचानक जाण्याने अख्खे कुटुंब उघड्यावर पडले आहे. तीन भावात चार एकर जमीन ,मयत प्रदीप यास पत्नी व तीन मुली आहेत. बँकेचे देणे, संसाराला लागणारा खर्च, व मुलीचे शिक्षण यासाठी आर्थिक ताळमेळ बसवणे शक्य झाले नसल्याने प्रदीप ने आत्महत्या केली आहे. हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेने नरंगल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.