उमरगा शहरातील त्रिकोळी रोडवर हमीद नगर नजीक मोठाले खड्डे पडले आहेत. ठीकठिकाणी ड्रेनेज लाईनवर पडलेल्या खड्ड्याने अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे तसेच रस्त्यावर गवत माजल्याने, रस्त्यानजीक कचऱ्याचे ढीग साचल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे रोगराई वाढत आहे.

या सर्व ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी फाऊंडेशनचे कार्यकर्ते माधव ऊर्फ दादा माने यांनी ‘५० खोके, रस्त्यावर भोके, एकदम ओक्के’ असा मजकूर लिहिलेले फलक घेवून ड्रेनेज लाईनवर पडलेल्या खड्यात ठिय्या मांडल्या तसेच रस्त्यावर माजलेल्या गवतावर झोपून ‘प्रशासन झोपले, म्हणून मीही झोपलो आहे’ असे फलक दर्शविले. यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी व्यंकट उर्फ राजू भालेराव, धानय्या स्वामी, शांताबाई चव्हाण, किशोर बसगुंडे, अशोक कांबळे, फारुख शेख, दत्ता पावले, अनिता कांबळे यांच्यासह हमीद नगर व गणु डॉक्टर प्लॉट परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

या लक्षवेधी आंदोलनाने तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. सदर समस्या न सुटल्यास येणाऱ्या काळात तिव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा फाऊंडेशन मार्फत देण्यात आला आहे.
