अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हवे-उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे आवाहन उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज केले.
३४ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे प्रांताधिकारी श्री. कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र बोरकर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सीमा गोसावी, विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. कांबळे म्हणाले, विविध कारणांनी रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. देशात दर दिवशी सुमारे ४२० व्यक्ती अपघातात मृत्यूमुखी पडतात. त्यातही वाहनचालकांची पुरेशी झोप होत नसल्याने रात्रीचे अपघात जास्त होतात. म्हणून शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्रांमध्ये प्रबोधन करून अपघातांविषयी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. केसकर यांनी अपघात रोखण्याविषयी मार्गदर्शन करून मागील वर्षात कार्यक्षेत्रात झालेले अपघात, त्या अनुषंगाने अपघात रोखण्यासाठी विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त १७ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातील वाहनचालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. केसकर यांनी यावेळी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे असे आहे नियोजन
१२ जानेवारी रोजी एम. एस. इंग्लिश स्कूल व माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. १३ जानेवारी रोजी कुरकुंभ, ता. दौंड येथील एमक्युअर फार्मास्युटीकल्स मध्ये रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन तर पालखी महामार्गावर, विद्या प्रतिष्ठान व माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
१४ जानेवारी रोजी औद्योगिक वसाहतीत पियाजो कंपनी, बारामती ॲग्रो, बाउली कंपनी लिमिटेड, येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना १५ जानेवारी रोजी बिल्ट पेपर कंपनी भिगवण व छत्रपती सहकारी साखर कारखाना येथे गुलाब पुष्प भेट देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
१६ जानेवारी रोजी परिवहन कार्यालय ते भिगवण चौक बारामती व बाह्यवळण रस्त्याने परत बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय या मार्गावर महिलांच्या दुचाकी रॅलीद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना रस्ता सुरक्षेबाबत व्याख्यान व आर.एन.ए.टी. हायस्कूल बारामती येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१७ जानेवारी रोजी वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेडद येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणी तर विद्या प्रतिष्ठान हायस्कूल व कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे