जिल्हाधिकारी राऊत यांनी लक्ष देण्याची दिलीपराव धर्माधिकारी यांची मागणी

बरबडा/प्रतिनिधी :

नायगाव तालुक्यातील बरबडा शिवारात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असल्याने,नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अक्षरशः माती झाली असून,यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.दहा दिवसाच्या काळात केवळ दोनशे ब्रासची परवानगी असताना सुमारे 35 हायवा द्वारे दिवसभर माती वाहतूक सुरू आहे.200 ब्रासची केवळ एक ते दोन दिवसातच वाहतूक होते, संबंधित प्रशासन दहा दिवस कसं काय परवानगी देऊ शकते..?संबधित प्रशासन आणि या माफियात संगनमत तर नाही ना असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना तसेच या भागातील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असून,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तत्काळ याकडे लक्ष देऊन अवैधरित्या होणारे माती उत्खनन थांबवून याची मोजणी करावी आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजप नेते दिलीपराव धर्माधिकारी तसेच सरपंच माधवराव कोलगाणे यांनी केली आहे.

बरबडा शिवारातील काही गट नंबर मधील माती उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाकडून 200 ब्रासची परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी पेक्षा कित्येक पटीने उत्खनन सुरू आहे. दिवसभर या भागात मोठ्या डंपर ची वाहतूक असते त्यामुळे सामान्य नागरिकांना या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाना धुळीचा त्रास होत आहे. अगदी काही महिन्यापूर्वी गोदमगाव ते वजीरगाव फाट्यापर्यंत सुमारे 10 कोटी खर्च करून रस्ता बनवण्यात आला होता. मात्र अवैधरित्या होणाऱ्या या मातीच्या उत्खननामुळे रस्त्याचीच माती झाली आहे. अगोदरच या भागात रस्त्याची दयनीय अवस्था आहे. या रस्त्यामुळे कसा बसा दिलासा मिळाला परंतु या माती माफियानी मात्र याची अक्षरशः वाट लावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *